Tuesday, September 9, 2014

गुगल ग्रीन

गुगल ग्रीन हा गुगल कंपनीचा एक स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम आहे. जगभरात आज औद्योगिक प्रदूषणामुळे तापमानवाढ होतेय. संपूर्ण जगाला औद्योगिक विकासासाठी उर्जेची प्रचंड गरज आहे. गुगल कंपनीलासुद्धा त्यांचे संगणक २४ तास ३६५ दिवस चालू ठेवण्यासाठी प्रचंड उर्जा लागते. पारंपारिक उर्जा स्त्रोतांपासून निर्माण होणाऱ्या विजेमुळे मोठ्याप्रमाणावर प्रदूषण होते व कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते. गुगल ग्रीन या उपक्रमा अंतर्गत कंपनीने आता अपारंपरिक उर्जा स्तोतांपासून निर्माण होणाऱ्या विजेचा जास्त वापर करण्यावर भर द्यायला सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून कंपनीने आपल्या कॅलिफोर्नियातील  मुख्यालयाच्या आवारातील सर्व इमारतींवर सोलार पॅनल बसवले आहेत. हे पॅनल १.९ मेगावॉट वीज निर्माण करतात. या सर्व इमारतींना लागणाऱ्या एकूण उर्जेच्या ३० टक्के उर्जा हे पॅनल निर्माण करतात.

गुगल हि एक संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे. इंटरनेट आधारित सेवा पुरवणे हा कंपनीचा प्रमुख व्यवसाय आहे. या सेवा पुरवण्यासाठी कंपनीला हजारो शक्तिशाली संगणकांची गरज लागते. हे संगणक कंपनी स्वतः बनवते. व संगणक बनवताना ते कमीतकमी ऊर्जेचा वापर करतील याची काळजी घेते. हे सर्व संगणक व या सर्व संगणकांना एकमेकांना जोडणारी उपकरणे हि एका मोठ्या इमारतीमध्ये ठेवली जातात. या इमारतींना डेटा सेंटर म्हणतात. कंपनीची जगभरात एकूण १२ डेटा सेन्टर्स आहेत. हि डेटा सेन्टर्स एकेका कारखान्या एवढी मोठी आहेत. या डेटा सेन्टर्सना २४ तास ३६५ दिवस चालू ठेवण्यासाठी प्रचंड उर्जा लागते. आणि म्हणून कमीतकमी ऊर्जेचा वापर करण्यासाठी या सर्व डेटा सेन्टर्सची आखणी आणि बांधकाम कंपनी स्वतः करते. त्यामुळे इतर कंपन्यांच्या तुलनेत गुगलची डेटा सेन्टर्स ५० टक्के कमी वीज वापरतात. कंपनीच्या अमेरिकेतील ७ पैकी ६ डेटा सेन्टर्सना आयएसओ ५०००१ मानांकन मिळाल आहे. हे मानांकन ऊर्जा व्यवस्थापन प्रणालीचा वापर करून ऊर्जेचा पूर्ण कार्यक्षमतेने उपयोग करणाऱ्या उद्योगांना देण्यात येत. या डेटा सेन्टर्सना लागणाऱ्या ऊर्जेपैकी जास्तीतजास्त ऊर्जा, अपारंपरिक म्हणजे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पामधून घेण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. कंपनीने आता पर्यंत एकूण १०३९ मेगावॉट वीज खरेदी करण्यासाठी ७ पवन ऊर्जा प्रकल्पांबरोबर करार केले आहेत.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीची वाहतूक व्यवस्था आहे.या वाहतूक व्यवस्थेमध्ये ५ टक्के बायोडिझेलवर चालणाऱ्या व सर्वात कमी प्रदूषण करणाऱ डिझेल इंजिन असलेल्या शटल बसेस आहेत. कंपनीचे ५००० कर्मचारी रोज घरून सानफ्रान्सिस्को परिसरातल्या कंपनीच्या कार्यालयांत जाण्यासाठी या बस चा वापर करतात. 

 तसेच गुगल कंपनीकडे शेव्रोले, निस्सान, मित्सुबिशी, फोर्ड व होंडा कंपनीच्या विजेवर चालणाऱ्या गाड्यांचा ताफा आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना विजेवर चालणाऱ्या गाड्या विकत घेण्यासाठी प्रोत्साहन देते. त्यासाठी कंपनीने आपल्या कार्यालयाच्या आवारातील वाहनतळावर विजेवर चालणाऱ्या गाड्या चार्ज करण्यासाठी लागणारी चार्जींग स्टेशन्स बसवली आहेत.
भविष्यात कर्मचार्यांना मोफत चार्जींगची सुविधा देण्याची कंपनीची इच्छा आहे. तसेच कंपनी कर्मचाऱ्यांना पाई चालत किंवा सायकलवरून येण्यासाठी देखील प्रोत्साहन देते. पाई चालत येणाऱ्या किंवा सायकलवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी डिजिटल तिकीट देते. या डिजिटल तिकिटाच डॉलर मध्ये रुपांतर करून ते डॉलर त्या कर्मचाऱ्याच्या आवडीच्या सामाजिक संस्थेला किंवा सामाजिक उपक्रमाला दान दिले जातात.
गुगल कंपनीला फक्त स्वतःसाठीच नाही तर सर्वांसाठी आणि सर्वच क्षेत्रात अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढवायचा आहे. म्हणून गुगल कंपनी त्यांना लागणारी वीज सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पातून फक्त विकतच घेत नाही तर अशा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक सुद्धा करते. आतापर्यंत कंपनीने अशा १६ प्रकल्पांमध्ये एकूण ६००० कोटी रुपयांची गुंवणूक करण्याचे करार केले आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये एकूण २००० मेगावॉट वीज निर्माण होणार आहे. या सर्व उपक्रमांतून कंपनीने आता पर्यंत २१५०० मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड वायुच प्रदूषण होण्यापासून रोखल आहे.

आपण गुगलचा वापर करत असताना त्यामुळे प्रदूषण व पर्यावरणाची हानी होणार नाही याची गुगल कंपनी काळजी घेते याच समाधान वाटत.

No comments:

Post a Comment