माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या तत्कालीन सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकाला एक राष्ट्रीय ओळख क्रमांक देण्यासाठी २००९ साली नियोजन आयोगाच्या अखत्यारीत युनिक आयडेंटीफिकेशन आॅथोरीटी ऑफ इंडियाची स्थापना केली. या योजनेची संकल्पना इन्फोसिसचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदन निलेकणी यांची होती. नंदन निलेकणीची युनिक आयडेंटीफिकेशन आॅथोरीटी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक करून त्यांना या योजनेची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश सरकारी कामकाजातील भ्रष्टाचार रोखून सरकारच्या विविध योजनांचा लाभ योग्य व गरजू लोकांना मिळवून देणे हा आहे. आधार ओळख क्रमांक देताना त्या नागरिकाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्याच्या हाताच्या बोटांचे व डोळ्यांच्या बुबुळाचे स्कॅनिंग करून ते संगणकावर साठवले जातात. यामुळे एका नागरिकाला एकच आधार क्रमांक मिळतो व सरकारला नागरिकाच्या हाताच्या बोटांच्या ठश्यांवरून व डोळ्यांच्या स्कॅनिंगवरून त्या नागरिकाची ओळख पटवता येऊ शकते. यामुळे प्रत्येक नागरिकाला सरकारी योजनेचा एकावेळी एकदाच लाभ घेता येणार आहे. आतापर्यंत ७५ कोटी भारतीयांना आधार क्रमांक देण्यात आले आहेत. युनिक आयडेंटीफिकेशन आॅथोरीटी ऑफ इंडियाच्या http://uidai.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून आपण आधार बद्दल सर्व माहिती जाणून घेऊ शकता.
तुम्ही आधार क्रमांकासाठी नोंदणी केली असल्यास https://resident.uidai.net.in/web/resident/check-aadhaar-status या संकेतस्थळावरून नोंदणीबद्दल माहिती मिळवू शकता. यासाठी तुमच्याकडे नोंदणी क्रमांक व नोंदणीवेळ असणे आवश्यक आहे.
तुम्हाला आधार क्रमांक मिळाला असल्यास त्याची इलेक्ट्रॉनिक प्रत आता तुम्ही http://eaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच तुमचा मोबाईल नंबर अद्ययावत असणे आवश्यक आहे.
तुम्ही https://ssup.uidai.gov.in/web/guest/update या संकेतस्थळावरून मोबाईल नंबर तसेच नाव, पत्ता, लिंग व जन्म तारीख अद्ययावत करू शकता. यासाठी तुमच्याकडे आधार क्रमांक व मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment